प्रधानमंत्र्यांच्या हस्ते केरळ, मध्य प्रदेशात विविध विकासकामांची पायाभरणी आणि लोकार्पण

किनारपट्टीवरची राज्यं आणि बंदरांची शहरं विकसित भारताच्या वाटचालीत महत्त्वाची भूमिका बजावतील, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. केरळात तिरुवअनंतपुरम मध्ये विळींजम इथं खोल पाण्यातल्या आंतरराष्ट्रीय बहुउपयोगी बंदराचं उद्घाटन आणि लोकार्पण आज मोदी यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. आतापर्यंत भारतातली ७५ टक्के  समुद्र मार्गाने होणारी आयात ही परदेशातल्या बंदरांवर होत होती. ही सर्व प्रक्रिया अत्यंत खर्चिक होती. आता मात्र, या विळिंजममुळे हा खर्च वाचणार असून त्याचा उपयोग केरळवासियांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्यासाठी होईल, असंही मोदी यावेळी म्हणाले. 

 

या सोहळ्याला केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल, केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. विळींजम इथे ८ हजार ८०० कोटी रुपये खर्चून उभारलेलं हे बंदर देशातलं पहिलं अर्धस्वयंचलित तसंच खोल पाण्यातली कंटेनर वाहतूक करणारं बंदर ठरणार आहे. विळिंजम बंदरामुळे भारत, मध्य आशिया आणि युरोपदरम्यान दळणवळणाचा सोयीचा मार्ग उपलब्ध होणार आहे.