गेल्या ११ वर्षांत बिहारला समृद्धी आणि विकासाच्या मार्गावर नेणारं राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार हे विकासाचं प्रतीक असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. बिहार इथे सिवानमध्ये एका जाहीर सभेला ते संबोधित करत होते. त्यांनी सिवान इथून ५ हजार ९०० कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं दूरस्थ पद्धतीने उद्घाटन आणि पायाभरणी केली. यामध्ये विविध नवीन रेल्वे गाड्यांचा शुभारंभ, प्रधानमंत्री घरकूल योजना, नमामी गंगे योजनेअंतर्गत ६ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचं उद्घाटन इत्यादी विकासकामांचा समावेश आहे. यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका केली.
त्यानंतर भुवनेश्वरमध्ये त्यांनी १८ हजार ६०० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं भूमीपूजन आणि लोकार्पण केलं. भाजपाच्या नेतृत्त्वामधल्या सरकारला ओडिशामध्ये एक वर्ष झाल्याच्या निमित्तानं आयोजित विविध कार्यक्रमात त्यांनी सहभाग नोंदवला. देशातली नक्षलवादाची समस्या लवकरच संपुष्टात येईल, असं ते म्हणाले.