देशप्रेमाचं प्रतीक असलेल्या वंदे मातरम् गीताच्या ‘शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी’ वर्षांचं उद्घाटन आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या निमित्ताने, देशभरात वर्षभर विविध कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते विशेष टपाल तिकीट आणि नाण्याचं प्रकाशन होणार आहे.
मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत, मंत्रालयातल्या त्रिमूर्ती प्रांगणात आज सकाळी १० वाजता ‘वंदे मातरम्’चं समूहगान होणार आहे. वंदे मातरम् ‘सार्ध शताब्दी’ महोत्सवाच्या माध्यमातून पुढील वर्षभर, राज्यभरात कौशल्य विकास विभागाच्या वतीनं विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.
राज्यातील विविध शैक्षणिक संस्था आणि शासकीय आस्थापनांमध्येही आज ‘वंदे मातरम्’ गीताचं समूहगान आयोजित करण्यात येणार आहे.
वंदे मातरम् गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाचा एक भाग म्हणून पुण्यात आज एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी ‘संगीत आनंदमठ’ नाटकाचा प्रयोगही सादर होईल, तसंच वंदे मातरम् ग्रंथाचं प्रकाशनही होणार आहे. वंदे मातरम गौरव समितीच्या वतीने पुण्यात उद्या वंदे मातरम गौरव यात्रा काढण्यात येणार आहे.
वंदे मातरम् गीताचे संशोधक आणि संगीत संग्राहक मिलिंद सबनीस यांनी आकाशवाणीशी बोलताना वंदे मातरम् गीताचं महत्त्व विशद केलं, ते म्हणाले
वंदे मातरम् गीताचे संशोधक आणि संगीत संग्राहक मिलिंद सबनीस यांची विशेष मुलाखत आज रात्री ८ वाजता दिल्लीवरुन प्रसारित होणार आहे. मुंबईसह राज्यातील सर्व केंद्रं ही मुलाखत सहक्षेपित करतील. त्यामुळे रात्री 8 वाजून 5 मिनिटांनी प्रसारित होणारं मराठी राष्ट्रीय बातमीपत्र आज रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी प्रसारित होईल.