उत्तराखंड राज्याचा आज २५ वा स्थापना दिवस आहे. स्थापना दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देहरादून इथं विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात प्रधानमंत्री मोदी विशेष टपाल तिकीटाचं प्रकाशन, उत्तराखंडमधल्या आठ हजार कोटी रुपयांच्या विकास कामांचं भूमीपूजन आणि उद्घघाटन केलं. तसंच प्रधानमंत्री पीकविमा योजनेतून २८ हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्याnareच्या बँक खात्यात ६२ हजार कोटी रुपये हस्तांतरित केले. कार्यक्रमा आधी प्रधानमंत्र्यांनी उत्तराखंडची प्रगती आणि संस्कृती दर्शवणाऱ्या विविध प्रदर्शनांना भेट दिली तसंच विविध लाभार्थ्यांशी संवाद साधला.
यानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उत्तरखंडमधल्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या उत्तराखंडमधे पर्यटनासह प्रत्येक क्षेत्रात विकास होत आहे, असं प्रधानमंत्री आपल्या समाजमाध्यमावरल्या संदेशात म्हणाले. उत्तरखंडवासीयांना चांगलं आरोग्य, आनंद, संपन्नता लाभो अशी त्यांनी प्रार्थना केली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही उत्तराखंडमधल्या नागरिकांना स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. आध्यात्मिक वारसा, सांस्कृतिक वैभव आणि नैसर्गिक सौंदर्याने संपन्न असं हे राज्य संपूर्ण देशाच्या श्रद्धेचं केंद्र आहे, असं शहा समाजमाध्यमावरल्या संदेशात म्हणाले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, आरोग्य मंत्री जे पी नड्डा आणि इतर मंत्र्यांनीही उत्तराखंड स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.