इतर देशांवरचं अवलंबित्व हाच भारताचा सर्वात मोठा शत्रू असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. गुजरातमधे भावनगर इथे समुद्र से समृद्धी या कार्यक्रमात आज ते बोलत होते. आपलं इतर देशांवरचं अवलंबित्व जेवढं कमी होईल तेवढी आपली शक्ती वाढेल असं ते म्हणाले. समुद्र से समृद्धी या कार्यक्रमामध्ये ३४ हजार २०० कोटी रुपयांच्या विकास कामांचं उद्घाटन केलं.
यामध्ये किनारपट्टीशी संबधित ७ हजार ८०० रुपयांच्या प्रमुख विकास प्रकल्पांचा समावेश आहे. यावेळी प्रधानमंत्र्यांनी ६६ हजार कोटी रुपयांचे २१ सामंजस्य करार बंदरे आणि नौवहन मंत्रालयाकडे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सुपूर्द केले. कच्छ मधे धोरडो हे गाव पूर्णपणे सौर ऊर्जेचा वापर करीत असून त्याचं लोकार्पण प्रधानमंत्र्यांनी केलं. गुजरातमधे यापूर्वी मोढेरा, सुखी आणि मसाली या गावामधेही पूर्णपणे केवळ सौर ऊर्जेचा वापर होतो.
स्वातंत्र्याप्राप्तीच्या शतकपूर्तीर्यंत म्हणजे २०४७पर्यंत विकसित व्हायचे असेल तर भारताला आत्मनिर्भर होण्याशिवाय पर्याय नाही. या विचारातून भारताचं सागरी क्षेत्र नवीन सुधारणा करत आहे. प्रशासकीय सुधारणा राबवल्यामुळे बंदर विकास आणि उलाढाल अधिक सुलभ झाली आहे असं प्रधानमंत्री म्हणाले.
गेल्या अकरा वर्षांमध्ये भारताच्या सागरी किनारपट्टी क्षेत्राने विकासाच्या दृष्टीने मोठं परिवर्तन अनुभवलं आहे असं केंद्रीय बंदरे नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी यावेळी सांगितलं. बंदरांची क्षमता दुप्पट झाली तसंच बंदरातून विक्रमी प्रवासी वाहतूक होऊ लागल्याचं त्यानी नमूद केलं. प्रधानमंत्र्यानी भावनगरला पोचण्यापूर्वी विमानतळापासून जवाहर मैदानापर्यत रोड शो केला.
 
									