नवी दिल्ली इथं आज झालेल्या सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय जल पुरस्कार २०२४ प्रदान करण्यात आले. यात महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्य विभागात प्रथम पुरस्कारने गौरवण्यात आलं. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. राज्य सरकारनं राबवलेल्या जलव्यवस्थापन धोरणांचा आणि शेतकरी, पाणी वापर संस्था तसंच प्रत्येक नागरिकाच्या सक्रिय सहभागाचा हा विजय आहे, अशी भावना विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.
या विभागात गुजरातला द्वितीय तर हरियाणाला तृतीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. याशिवाय उत्कृष्ट स्थानिक स्वराज्य विभागात नवी मुंबई महानगरपालिकेने प्रथम पुरस्कार पटकावला. तर सर्वोत्कृष्ट जलवापरकर्ता संस्था विभागात नाशिक जिल्ह्यातल्या कनिफनाथ जलवापर सहकारी संस्थेला द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
अमृताइतक्याच मौल्यवान असलेल्या जल संसाधनाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी काम करणाऱ्या सर्वांचं कौतुक करावं तेवढ थोडं आहे, अशी भावना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यावेळी व्यक्त केली. गेल्यावर्षी सुरू झालेल्या जलसंवर्धन जनसहभाग उपक्रमाद्वारे ३५ लाखांहून अधिक भूजल पुनर्भरण संरचना उभारल्या गेल्या असं राष्ट्रपतींनी यावेळी सांगितलं.
या कार्यक्रमात केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील, जलशक्ती राजमंत्री व्ही सोमन्ना आणि राजभूषण चौधरी उपस्थित होते. या पुरस्कार सोहळ्यात दहा विभागांमधे ४६ पुरस्कार प्रदान करण्यात आले.