राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आफ्रिकेतील अंगोला आणि बोंत्सवाना या दोन राष्ट्रांच्या दौऱ्यावर असून काल रात्री त्या अंगोलाची राजधानी लुआंडा इथ पोहचल्या. भारत आणि अंगोला यांच्यातील द्विपक्षीय संबंधांच हे 40 व वर्ष असून आतापर्यंतची भारतीय राष्ट्रपतींची ही पहिलीच अंगोला भेट आहे. अंगोलाचे राष्ट्रपती जोआओ मैनुअल गोंजाल्विस लौरेंको यांच्याबरोबर आज राष्ट्रपती मुर्मू द्विपक्षीय चर्चा करणार असून , त्यानंतर दोन्ही देशांदरम्यान विविध करारांवर हस्ताक्षर करण्यात येणार आहेत. राष्ट्रपती मुर्मू येत्या मंगळवारपर्यंत अंगोला इथ राहणार असून यादरम्यान त्या अंगोला राष्ट्र स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. तसच तिथल्या संसदेला संबोधित करणार आहेत . अंगोलातील भारतीय समुदायाशीही राष्ट्रपती मुर्मू संवाद साधणार असून तिथल्या महत्वाच्या व्यक्तींची भेट घेणार आहेत .
या वर्षाच्या सुरुवातीला अंगोलाचे राष्ट्रपती प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना भेटले होते त्यावेळी भारताने अंगोलाच्या संरक्षण क्षेत्राच्या आधुनिकीकरणसाठी २०० दशलक्ष डॉलर्सची मदत जाहीर केली होती.
सध्या दोन्ही देश या करारावर चर्चा करत आहेत. या करारानंतर अंगोला भारताकडून काही संरक्षण साधने आणि उपकरणे खरेदी करू शकतो.
अँगोला हा आफ्रिकेतला भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा तेल आणि ऊर्जा पुरवठादार आहे. तिथे नवीन तेलक्षेत्रे सापडल्यामुळे भारत अँगोलाला तेल शुद्धीकरण आणि शोध कामांमध्ये मदत करू शकतो.
भारत अँगोलाला अन्नसुरक्षा मिळवण्यासाठीही मदत करू शकतो — म्हणजेच कृषी क्षेत्रात तंत्रज्ञान आणि यंत्रसामग्री देऊन शेती सुधारण्यासाठी सहकार्य करू शकतो.
या भेटीत दोन्ही देश आरोग्य सेवा, अवकाश तंत्रज्ञान, डिजिटल सार्वजनिक व्यवस्था यांसारख्या क्षेत्रांमध्येही सहकार्याबद्दल बोलू शकतात.
त्याचबरोबर काही आंतरराष्ट्रीय उपक्रमांमध्ये भागीदारी वाढवण्यावरही चर्चा होऊ शकते
दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात 11 ते 13 नोव्हेंबर या कालावधीत बोंत्सवाना या आफ्रिकेतल्या दुसऱ्या देशाच्या भेटीसाठी जाणार आहेत.