डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

राष्ट्रपतींच्या हस्ते ‘राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार’ प्रदान

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात देशातल्या नामवंत शास्त्रज्ञांना २०२४ सालचे  ‘राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार’ प्रदान केले. यामध्ये महाराष्ट्रातल्या ८ शास्त्रज्ञांचा समावेश आहे. 

प्रा.  गोविंदराजन पद्मनाभन यांना यावेळी  ‘विज्ञानरत्न २०२४’ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. मुंबईतल्या भाभा अणु संशोधन केंद्रातले डॉ. आवेश कुमार त्यागी यांना अणुऊर्जा क्षेत्रातल्या विज्ञान श्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. डॉ. आनंदरामकृष्णन यांना कृषी विज्ञान क्षेत्राचा विज्ञान श्री पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पुण्यातल्या भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेतले प्रा. जयंत उदगावकर यांना जीवशास्त्रातला विज्ञान श्री पुरस्कार प्रदान करण्यात आला.  आयआयटी मुंबई इथले प्रा. रोहित श्रीवास्तव यांना तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रातल्या योगदानासाठी पुरस्कार देण्यात आला. मुंबईत टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मधले प्रा. विवेक पोलशेट्टीवार यांना रसायन विज्ञान क्षेत्रातल्या योगदानासाठी पुरस्कार देण्यात आला. 

पुण्यातल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी या संस्थेतले डॉ. रॉक्सी मॅथ्यू कोल यांना पृथ्वी विज्ञान क्षेत्रातल्या योगदानासाठी पुरस्कार देण्यात आला. 

अकोल्यातले  डॉ. प्रशांत मंगले,  यवतमाळचे  डॉ. यशवंत गोटे आणि  पुण्यातल्या आयसीएमआर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी मधल्या डॉ. प्रज्ञा यादव यांना आज राष्ट्रपतींच्या हस्ते विज्ञान पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.