राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि बोत्सवानाचे अध्यक्ष डुमा गिडॉन बोको यांच्यात आज द्विपक्षीय चर्चा झाली. यात दोन्ही नेत्यांनी व्यापार आणि गुंतवणूक, शेती, अक्षय्य ऊर्जा, आरोग्य, शिक्षण, कौशल्य विकास, संरक्षण आणि डिजिटल तंत्रज्ञान यासारख्या प्रमुख क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर सहमती दर्शवली. आरोग्य सेवा आणि औषध निर्माण सहकार्यासाठी यावेळी दोन्ही नेत्यांमधे करार करण्यात आला. बोत्सवानाला एआरव्ही औषधं देण्याची घोषणाही यावेळी राष्ट्रपतींनी केली. या करारामुळे आरोग्य सेवेतली समस्या दूर होऊन बोत्सवानाला परवडणाऱ्या औषधांचा पुरवठा सुलभ होईल, असं डुमा गिडॉन बोको म्हणाले.
यावेळी प्रोजेक्ट चित्ताची घोषणा करण्यात आली. या अंतर्गत बोत्सवाना भारताला आठ चित्ते भेट म्हणून देणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना उद्या या चित्त्यांचं प्रतिकात्मक हस्तांतरण केलं जाईल.
शिक्षण, आरोग्य, संरक्षण आणि कौशल्य विकास या क्षेत्रांमधे सहकार्य करून भारताने बोत्सवानाच्या प्रगतीत महत्त्वाची भूमिका निभावली आहे,असं राष्ट्राध्यक्ष डुमो बोको म्हणाले. तसंच भारताची डिजिटल प्रगती बोत्सवानासाठी प्रेरणादायक आहे, असंही ते म्हणाले.
यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी डायमंड ट्रेडिंग कंपनीला भेट दिली. राष्ट्रपती तिथल्या संसदेला संबोधित करणार आहेत तसंच तिथल्या, भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत. बोत्सवाना मधल्या ऐतिहासिक स्थळांना ही त्या भेट देतील. भारताच्या राष्ट्रपतींची ही पहिलीच बोत्सवाना भेट आहे.