राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रीय गीत वंदे मातरमच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवानिमित्त अभिवादन केलं आहे. स्वातंत्र्यसमराच्या काळात ब्रिटिशांच्या विरोधात सन्यांशांनी पुकारलेल्या बंडाच्या वेळी बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी या अमर गीताची रचना केली होती, असं राष्ट्रपतींनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. हे गीत आजही सर्व भारतीयांना एका सूत्रात बांधून ठेवण्याचं काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं. यानिमित्तानं सर्व नागरिकांनी भारतमातेच्या समृद्धीसाठी काम करण्याचा संकल्प करावा, असं आवाहन त्यांनी केलं.
उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनीही वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताला अभिवादन केलं. हे राष्ट्रभावना जागवणारं आणि पिढ्यांना प्रेरणा देणारं शाश्वत गीत आहे, असं त्यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.