पुण्याचे माजी महापौर आणि नुकताच राजीनामा दिलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पक्षाच्या पुण्यातल्या अनेक पदाधिकाऱ्यांसह आज काँग्रेसमधे प्रवेश केला. मुंबईत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जगताप आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं पक्षात स्वागत केलं.
नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष विजयी झाले, त्यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला. आगामी महापालिका निवडणुकीसाठी ‘काँग्रेस लढणार, महाराष्ट्र जिंकणार’, या टॅगलाईनचं आणि टिझरचं प्रकाशनही करण्यात आलं.
मुंबई महानगरपालिकेची निवडणूक, काँग्रेस, “विवाद नको, विकास हवा” या धोरणावर लढवणार आहे. लवकरच मुंबई काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध केला जाईल, अशी माहिती खासदार वर्षा गायकवाड यांनी दिली. मुंबईत रस्ते, वाहतूक कोंडी, प्रदुषण, खड्डे या समस्यांवर काँग्रेसनं आवाज उठवला आहे. त्यामुळे इतर कोणताही विवाद निर्माण न करता, यंदाची महापालिका निवडणूक मुंबईकरांच्या प्रश्नांवर लढवणार असल्याचं गायकवाड यांनी सांगितलं.