राष्ट्रसेविका समितीच्या माजी प्रमुख संचालक प्रमिलाताई मेढे यांचं आज नागपुरात वार्धाक्यानं निधन झालं. त्या ९७ वर्षांच्या होत्या. त्यांचं पार्थिव नागपूरच्या देवी अहल्या मंदिरात अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे. प्रमिलाताईंच्या इच्छेनुसार त्यांचा देह एम्स रुग्णालयाला दान करण्यात येणार आहे.
राष्ट्र सेविका समितीच्या माध्यमातून त्यांनी महिला सक्षमीकरणासाठी भरीव कार्य केलं. १९७८ पासून कार्यवाहिका म्हणून तर २००३ ते २००६ या काळात प्रमुख संचालक पद त्यांनी भूषवलं. त्यांना नागपूर विद्यापीठाने डी लिट ने सन्मानित केलं होतं.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रमिलाताईंच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. स्वयंसेवकांनी मातृतुल्य व्यक्तिमत्व गमावलं असल्याचं त्यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे.
भारतभर फिरुन राष्ट्र सेविका समितीचं कार्य देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी प्रमिलाताई मेढे यांनी केलेल्या प्रयत्नांचा गौरव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकसंदेशात केला असून आदरांजली वाहिली आहे.