दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग इथं सुरु असलेल्या जी ट्वेंटी नेत्यांच्या शिखर परिषदेचा आज समारोप होईल. या परिषदेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सर्वांसाठी समन्यायी भविष्य – अत्यावश्यक खनिजे, योग्य काम आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या संकल्पनेवर आधारित शिखर परिषदेच्या तिसऱ्या सत्रात सहभागी होतील, आणि या सत्राला संबोधितही करतील. या सत्राआधी ते भारत-ब्राझील-दक्षिण आफ्रिका अर्थात इब्सा या त्रिपक्षीय मंचाच्या बैठकीला उपस्थित राहतील.
आज शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर, प्रधानमंत्री मोदी दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरील रामाफोसा, जपानचे प्रधानमंत्री सनाई टाका, कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी आणि इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबत द्विपक्षीय बैठका घेणार आहेत. त्यानंतर, ते संध्याकाळी मायदेशासाठी रवाना होतील.
दरम्यान, या परिषदेसाठी जोहान्सबर्ग इथं पोहचल्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अनेक जागतिक नेत्यांची भेट घेतली. ब्रिटनचे प्रधानमंत्री किएर स्टार्मर, मलेशियाचे प्रधानमंत्री अन्वर इब्राहिम, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मेर्झ, दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली जे-म्युंग, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा आणि संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांची त्यांनी भेट घेतली. प्रधानमंत्री मोदींनी सिएरा लिओनचे राष्ट्राध्यक्ष ज्युलियस माडा बायो आणि सिंगापूरचे प्रधानमंत्री लॉरेन्स वोंग यांच्याशीही संवाद साधला.
या भेटींमधून जागतिक प्रगती आणि समृद्धीसाठीची सामायिक वचनबद्धता भारतानं पुन्हा एकदा व्यक्त केल्याचं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. या परिषदेच्या आयोजनाबद्दल आणि उत्साही स्वागताबद्दल प्रधानमंत्र्यांनी दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरील रामाफोसा यांचे आभारही मानले आहेत.