प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, म्हणजे शेतकऱ्यांच्या कल्याणाप्रति असलेल्या सरकारच्या वचनबद्धतेचा वस्तुपाठ असून, गेल्या दशकभरात शेतकऱ्यांच्या प्रत्येक समस्येचं निराकरण करण्यासाठी सरकारने पूर्ण क्षमतेनं काम केल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज उत्तरप्रदेशमध्ये वाराणसी इथं प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता जारी करताना बोलत होते. या हप्त्याअंतर्गत देशभरातल्या ९ कोटी ७० लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २१ हजार कोटी रुपये थेट हस्तांतरित केले जातील.
प्रधानमंत्री मोदी यांनी आज उत्तरप्रदेशमध्ये वाराणसी इथं सुमारे २ हजार २०० कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं उदघाटन आणि पायाभरणी केली. यावेळी त्यांनी ‘दिव्यांगजन’ आणि वृद्ध लाभार्थ्यांना ७ हजार ४०० सहाय्यक साहित्याचं वितरण केलं. त्यानंतर त्यांनी जनसभेला संबोधित केलं.
सणासुदीच्या काळात स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देऊन ‘व्होकल फॉर लोकल’ला पाठबळ देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
यासह प्रधानमंत्र्यांनी रस्ते सुधारणा, वीज प्रकल्प यांसह अनेक नवीन पायाभूत सुविधा आणि पुनर्विकासाशी संबंधित कामांची पायाभरणी आणि उद्घाटनही केलं.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या हप्ता वितरणाच्या निमित्तानं आज राज्यात मुंबईसह, जळगाव, मालेगाव आणि बुलडाणा इथंही विशेष कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ हे या विविध ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात सहभागी झाले होते.