स्पेन आणि पोर्तुगालमध्ये अचानक मोठ्या प्रमाणात वीजपुरवठा खंडित झाल्यानं काल दैनंदिन जनजीवन विस्कळीत झालं होतं. आज सकाळपासून हळूहळू वीजपुरवठा सुरळीत होत आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यानं विमानसेवा ठप्प झाली, सार्वजनिक वाहतूक आणि रुग्णालयातील सेवाही विस्कळीत झाल्या होत्या. मात्र, वीजपुरवठा खंडित होण्याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
या अनपेक्षितरीत्या उद्भवलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर स्पेनच्या गृह मंत्रालयानं राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली असून देशभरात 30 हजार पोलीस अधिकारी तैनात केले आहेत. दोन्ही देशांमध्ये मंत्रिमंडळाच्या तातडीच्या बैठका झाल्या आणि नेत्यांनी परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.
स्पेनचे प्रधानमंत्री पेड्रो सांचेझ यांनी देशाच्या निम्म्या भागाचा वीजपुरवठा पूर्ववत झाल्याचं आज म्हटलं आहे. पोर्तुगालचे प्रधानमंत्री लुईस मॉन्टेनेग्रो यांनी या संकटामागे सायबर हल्ला असल्याची शक्यता नाकारली असून, पोर्तुगालमधील परिस्थिति पूर्ववत होण्यास एक आठवडा लागू शकतो, असं स्पष्ट केलं आहे.