डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

पोलिस स्मृतिदिनानिमित्त शहीद पोलिसांना अभिवादन

आज पोलीस स्मृतिदिन आहे. १९५९ मध्ये याच दिवशी लडाखमधे  हॉट स्प्रिंग्ज इथं सशस्त्र चिनी सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात दहा शूर पोलिसांना वीरमरण आलं. तेव्हापासून दरवर्षी २१ ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. 

 

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज पोलीस स्मृतिदिनानिमित्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या सर्वोच्च बलिदानाला अभिवादन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पोलिस कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावताना दिलेल्या सर्वोच्च बलिदानाचं स्मरण करून त्यांना आज श्रद्धांजली  वाहिली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही आज नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय पोलीस स्मारकात शहीदांना पुष्पहार अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी केंद्रीय सशस्त्र पोलिस दल आणि दिल्ली पोलिसांचं संयुक्त संचलन झालं.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आज मुंबईतल्या नायगाव इथल्या पोलीस मुख्यालयात पोलीस  स्मृतीस्तंभावर पुष्पचक्र अर्पण करून  त्यांना अभिवादन केलं. आपलं कर्तव्य बजावताना वीरमरण आलेल्या  भारतातल्या  विविध पोलीस दलांमधल्या अधिकारी आणि अंमलदारांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी असलेल्या संदेशपत्राचं यावेळी वाचन करण्यात आलं. हे राष्ट्र पोलिसांचं बलिदान कधीही विसरणार नाही, असं मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.

 

राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यावेळी उपस्थित होत्या. पोलीस स्मृतीदिनानिमित्त राज्यातल्या सर्व जिल्हा मुख्यालयांमधे  अभिवादनाचे कार्यक्रम होत आहेत. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलीस स्मृतीस्तंभावर पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिली. 

 

रत्नागिरी पोलीस मुख्यालयातही आज पोलीस स्मृतिदिन कार्यक्रम पार पडला. या वेळी  शहीद  पोलीस स्मारकावर  पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. तसंच दोन मिनिटं मौन पाळून हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

 

नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या मुख्यालयातल्या शहीद स्मारकावरही आज पोलीस स्मृती दिनानिमित्त पुष्पचक्र अर्पण करून  श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी पोलीस दलामार्फत हवेत बंदूकीच्या तीन फैरी झाडून शहिदांना मानवंदना देण्यात आली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.