पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेल्या तीन दिवसांपासून हिंसक आंदोलनं सुरू असून त्यामधे आज आणखी ९ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या २१ झाली असून त्यात तीन पोलिसांचा समावेश आहे. या बंदला हिंसक वळण लागल्यानं उद्भवलेल्या हिंसाचारात १७२ पोलीस कर्मचारी आणि ५० नागरिक जखमी झाले आहेत. संयुक्त अवामी कृती समिती जेएएसीचे केंद्रीय नेते शौकत नवाज मीर यांनी या प्रदेशातल्या सुधारणांची मागणी करत बंदचं आवाहन केलं होतं. सत्ताधिकाऱ्यांचे विशेषाधिकार रद्द करणं, कोटा प्रणाली रद्द करणं, संपूर्ण प्रदेशात मोफत आणि समान शिक्षण, मोफत आरोग्य सुविधा, आंतरराष्ट्रीय विमानतळांची बांधणी अशा मागण्या मीर यांनी केल्या होत्या. बंद पुकारल्यानंतर मुजफ्फराबाद, मीरपूर, पूंछ, नीलम, भिंबर आणि पलांद्री या भागातलं जनजीवन ठप्प झालं आहे.
मोरोक्को इथे आर्थिक संकटांचा सामना करण्याऐवजी आगामी फिफा विश्वचषकासाठी फुटबॉल मैदान बांधण्याचा निर्णय घेणाऱ्या सरकारविरोधात तरुणांनी आंदोलन सुरू केलं आहे. आज या आंदोलनावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाला.