केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज दूरस्थ पद्धतीनं प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २१ वा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला. २ लाख ७० हजार महिला शेतकऱ्यांसह २७ लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण ५४० कोटींहून अधिक रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्र्यांनी दिली.
पूर आणि भूस्खलनाचा मोठा फटका बसलेल्या हिमाचल प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंडमधील शेतकऱ्यांना हा हप्ता प्राधान्याने देण्यात आला आहे. फेब्रुवारी २०१९ मध्ये ही योजना सुरू झाल्यापासून या तिन्ही राज्यांना १३ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी वितरित केला आहे, असं कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने सांगितलं.
दरम्यान, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्ली इथं रशियाचे उपपंतप्रधान दिमित्री पात्रुशेव याची भेट घेत कृषी आणि अन्न सुरक्षा क्षेत्रात परस्पर सहकार्यावर चर्चा केली.