प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून ब्रिटन आणि मालदीवच्या दौऱ्यावर जात आहेत. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात मोदी ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करतील तसंच ब्रिटनचे राजे चार्ल्स यांची भेट घेतील. दोन्ही देशांच्या दौऱ्यात प्रधानमंत्री विविध उद्योगांच्या प्रतिनिधींशी चर्चा करतील असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्री नवी दिल्लीत वार्ताहरांना सांगितलं. भारत आणि ब्रिटनच्या प्रधानमंत्र्यांच्या भेटीत प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय विषयांवर चर्चा होईल, परस्परांसोबतची भागीदारी बळकट करण्यासाठी दोन्ही देश वचनबद्ध आहेत, असं मिस्री म्हणाले.
दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात प्रधानमंत्री मोदी २५ आणि २६ जुलै रोजी मालदीवच्या दौऱ्यावर जाणार आहेत. २६ जुलैला मालदीवच्या ६० व्या स्वातंत्र्यदिवसानिमित्त प्रधानमंत्री प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. मालदीव हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार असून मुक्त व्यापार करार आणि गुंतवणूक कराराबाबत वाटाघाडी करण्यासाठी दोन्ही देशात चर्चा सुरू आहे. या भेटीत प्रधानमंत्री मोदी मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोईज्जु यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार असून अनेक प्रकल्पांचं उद्घाटन करणार आहेत, असं मिस्री यांनी सांगितलं.