प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी इथं मॉरिशसचे प्रधानमंत्री नवीनचंद्र रामगुलाम यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. यावेळी भारत आणि मॉरीशस यांच्यात चार सामंजस्य करार झाले. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्याचा करार, राष्ट्रीय सागरीविज्ञान संस्था आणि वैज्ञानिक औद्योगिक संशोधन परिषदेचा मॉरिशसच्या सागरीविज्ञान संस्थेबरोबरचा करार, प्रशासकीय सुधारणासाठी उभय देशातल्या कार्मिक आणि निवृत्तीवेतन विभागांमधला करार, तसंच दूरसंवाद, आणि अंतराळविज्ञान क्षेत्रात सहकार्यासाठीचा करार यांचा त्यात समावेश आहे. याखेरीज , मॉरिशसमधल्या ऊर्जा आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांना भारताकडून अर्थसहाय्य, आणि जलसंसाधन क्षेत्रात सहकार्य या विषयीच्या आणखी ३ समझोत्यांवर आज स्वाक्षऱ्या झाल्या.
उभय राष्ट्रांमधले संबंध दृढ होत आहेत. भारत आणि मॉरिशस केवळ भागीदार नव्हे तर एका कुटुंबाचे सदस्य आहेत असं बैठकीनंतर संयुक्त संबोधनात प्रधानमंत्री मोदी म्हणाले. भारताबाहेरचं पहिलं जनऔषधी केंद्र मॉरिशसमधे सुरू होत असल्याची माहिती त्यांनी दिली. ऊर्जा सुरक्षा हा उभय देशातल्या संबंधांचा आधारस्तंभ आहे.
सागरी वाहतुकीची सुरक्षा, चांचेगिरी, आणि अमली पदार्थांची तस्करी या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी भारत आणि मॉरिशस एकत्र येऊन प्रयत्न करत असल्याचं परराष्ट्र विभागाचे सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.