प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि पॅराग्वेचे अध्यक्ष सॅंटियागो पेना पॅलासिओस यांच्यात नवी दिल्ली येथे शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा झाली. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांच्या संपूर्ण क्षेत्रांचा आढावा घेतला. दोन्ही देशांमध्ये डिजिटल तंत्रज्ञान, शेती, संरक्षण, रेल्वे, अंतराळ यासह इतर क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध असून दहशतवादाविरुद्धच्या लढाईत दोन्ही देश एकसाथ असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले.
पॅलासिओस हे आज सकाळी तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर नवी दिल्लीत पोहोचले. परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी त्यांची भेट घेतली आणि विविध क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यावर चर्चा केली. यानंतर ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचीही भेट घेणार आहेत. पॅराग्वेला परतण्यापूर्वी ते मुंबईलाही भेट देणार असून या भेटीदरम्यान ते राजकीय नेते, व्यावसायिक तसंच विविध उद्योगांचे प्रतिनिधी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या व्यक्तींची भेट घेतील.