मालदीव दौऱ्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी दोन दिवसांच्या तमिळनाडू दौऱ्यासाठी तुतिकोरीन इथं पोहोचतील. तुतिकोरीन विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीचं उद्घाटन ते करतील. तसंच ४ हजार ६०० कोटी रुपयांच्या विविध विकासकामांची पायाभरणी आणि लोकार्पण प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.
अरियालूर जिल्ह्यातल्या गंगईकोंडा चोलापुरम मंदिरात चोल सम्राट राजेंद्र चोल पहिले यांच्या स्मरणार्थ आयोजित आदि थिरुवादिरई उत्सवातही प्रधानमंत्री सहभागी होतील. राजेंद्र चोल यांनी आग्नेय आशियावर समुद्रमार्गाने केलेल्या चढाईला १ हजार वर्षं पूर्ण झाल्याच्या, तसंच चोल स्थापत्यकलेचा उत्तम नमुना असलेल्या गंगईकोंडा चोलापुरम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाल्याच्या स्मरणार्थ हा उत्सव आयोजित केला जातो.