April 6, 2025 8:42 PM

printer

तामिळनाडूमध्ये रामेश्वरम इथल्या नवीन पंबन रेल्वे पुलाचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

गेल्या दहावर्षात भारतानं आपली अर्थव्यवस्था दुपटीनं वाढवली असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आज तमीळनाडूत रामेश्वरम इथं समुद्रावरच्या उभ्या उघडता येणाऱ्या पंबन रेल्वे पुलाच्या उद्घाटनासह विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाली. त्यानंतर आयोजित सभेला त्यांनी संबोधित केलं. गेल्या दहा वर्षात केंद्र सरकारनं पायाभूत सुविधांसाठीची अर्थसंकल्पीय तरतुद सहा पटीनं वाढवली आहे, आणि देशाची चारही टोकं जोडण्याच्या उद्देशानं पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्यासाठी समर्पित प्रयत्न केले आहेत असं ते म्हणाले. देशात पायाभूत सुविधांचं वेगानं काम होत असल्याचं ते म्हणाले, यावेळी त्यांनी उपस्थितांसमोर मुंबईतील अटल सेतूसह देशभरात उभारलेल्या पुलांची उदाहरणं मांडली. 

 

यावेळी प्रधानमंत्र्यांनी माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचा रामेश्वरममध्ये जन्म झाल्याचा उल्लेख केला. कलाम यांच्या जीवनातून विज्ञान अध्यात्माशी कशी रितीनं जोडलं गेलं आहे हे दिसून येतं असं ते म्हणाले.

 

केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळेच गेल्या दहा वर्षात  श्रीलंकेच्या ताब्यातल्या ३ हजार ७०० मच्छीमारांची सुटका झाली असल्याची माहितीही त्यांनी दिली.

 

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज उद्धाटन झालेल्या पंबन रेल्वे पुलाच्या उभारणीसाठी साडेपाचशे कोटी रुपयांचा खर्च आला असून, सांध्याचं जोडणीतंत्र वापरून हा पुल उभारला आहे.

 

या नवा रेल्वेपुलामुळे रामेश्वरमची चेन्नईसोबतची दळणवळणीय जोडणी सुधारेल, आणि प्रवासी आणि मालवाहतूकीसह पर्यटन क्षेत्रालाही लाभ होईल, तसंच रोजगार निर्मिती होईल असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. या पुलाच्या निर्मितीत योगदान दिलेल्या अभियंत्यांचंही त्यांनी अभिनंदन केलं.

 

यावेळी प्रधानमंत्र्यांनी या पुलाखालून जाणाऱ्या पहिल्या जहाजाला, तसेच या पुलावरून जाणाऱ्या रामेश्वरम तांबरम एक्सप्रेसला देखील हिरवा झेंडा दाखवला. यानंतर प्रधानमंत्री रामेश्वरममधे एका रोड शोमध्ये सहभागी झाले. त्यांनी रामनवमीच्या निमित्तानं रामेश्वरम मंदिरात जाऊन दर्शनही घेतलं.

 

रामेश्वरम इथं आयोजित सभेत प्रधानमंत्र्यांच्या हस्ते तमीळनाडूमधील ८ हजार ३०० कोटी रुपयांच्या रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण देखील झालं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.