प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नेपाळमधील घडामोडींवर चर्चा करण्यासाठी मंत्रिमंडळ सुरक्षा समितीची काल बैठक घेतली. नेपाळमधील हिंसा ह हृदयद्रावक आहे. तिथल्या जीवितहानीबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केलं तसंच नेपाळच्या स्थिरता, शांती आणि समृद्धीचं महत्व आपल्या समाजमाध्यमांवरील संदेशामधून अधोरेखित केलं.
नेपाळमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र राज्य आपत्कालीन कार्य केंद्रामार्फत महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या नेपाळमध्ये प्रवास टाळावा. जे नागरिक नेपाळमध्ये आहेत त्यांनी आपल्या निवासस्थानीच सुरक्षित राहावं, स्थानिक प्रशासनाच्या तसंच दूतावासाच्या सूचनांचं पालन करावं, कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी दूतावासाच्या मदत क्रमांकांवर संपर्क साधावा, अधिकृत माध्यमांद्वारेच दिलेली माहिती ग्राह्य धरावी आणि अफवांपासून दूर राहावं, असं आवाहन या केंद्रामार्फत करण्यात आलं आहे.
एअर इंडिया आणि इंडिगोसहित इतर अनेक विमान कंपन्यांनी नेपाळसाठीची प्रवासी उड्डाणं रद्द केली आहेत.दरम्यान, नेपाळच्या सीमेवर असलेल्या जिल्ह्यांमधे उत्तरप्रदेश आणि पश्चिम बंगाल सरकारनं हाय अलर्ट जारी केला आहे. तसंच या भागात पोलिसांची अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली आहे.
पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यातल्या नेपाळला लागून असलेल्या भागांमधे गुप्तचर यंत्रणेत वाढ करण्यात आली आहे. तसंच बलरामपूर, बहरीच, लखीमपूर खेरी, सिद्धार्थनगर, महाराजगंज आणि श्रावस्ती या उत्तरप्रदेशातल्या जिल्ह्यांमधे सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.