उद्योगांना सुविधा पुरवण्यासाठी सर्व राज्यांनी पुढाकार घ्यावा, प्रधानमंत्र्यांचं आवाहन

छोट्या शहरांमधे उद्योग उभारणीसाठी योग्य जागा शोधून तिथं उद्योगांना सर्व सुविधा पुरवण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांना केलं आहे. राज्यांच्या मुख्य सचिवांच्या चौथ्या राष्ट्रीय परिषदेत ते काल नवी दिल्लीत बोलत होते. सरकारी प्रक्रियांमध्ये सुटसुटीतपणा आणावा जेणेकरुन नागरिकांना त्रास सहन करावा लागणार नाही असं प्रधानमंत्र्यांनी सुचवलं. राज्यांनी लोकसहभाग वाढवण्यासाठी प्रशासकीय कामकाजात सुधारणा करावी. लोकांना सरकारच्या विविध उक्रमांची माहिती द्यावी, असं मोदी म्हणाले. फिट इंडिया आणि क्षयरोगमुक्त भारत या उपक्रमांच्या अंमलबजावणीत आशा आणि अंगणवाडी सेविका महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. तसंच जिल्हा आणि गट स्तरावरील अधिकारी स्थानिक पातळीवर मोठे बदल घडवून आणू शकतात असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी या परिषदेत व्यक्त केला. तीन दिवसांच्या या राष्ट्रीय परिषदेचा काल समारोप झाला.