डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

उत्तराखंडमधे, देहरादून इथल्या महाराणा प्रताप स्टेडियमवर ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. सरकार खेळाडूंसाठी जास्तीत जास्त संधी निर्माण करत असून खेळ हे देशाच्या सर्वांगीण विकासाचं प्रमुख अंग आहे, असं प्रतिपादन मोदी यांनी यावेळी केलं. खेळासाठी आधुनिक पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत, असं सांगत खेळासाठी सरकार करत असलेल्या तरतुदींचा उल्लेख प्रधानमंत्र्यांनी केला. 

 

खेलो इंडियाच्या माध्यमातून खेळाडूंना पुढे जाण्याची संधी उपलब्ध करून दिली जात आहे, देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात खासदार क्रीडा महोत्सव आयोजित केले जात आहेत, खेळाडूंना आपलं सामर्थ्य वाढण्यासाठी याचा उपयोग होतो असं प्रधानमंत्री म्हणाले. 

 

ग्रीन गेम्स ही यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची मध्यवर्ती संकल्पना आहे. तर उत्तराखंडचा राज्यपक्षी असलेल्या मोनाल वरून प्रेरणा घेत माऊली हे क्रीडा स्पर्धेचं शुभंकर चिन्ह निवडण्यात आलं.

 

उत्तराखंडमधल्या आठ जिल्ह्यात ११ शहरांत २८ जानेवारी ते १४ फेब्रुवारी या कालावधीत ही क्रीडा स्पर्धा होणार आहे. योग आणि मल्लखांब या खेळांचा पहिल्यांदा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये समावेश केला आहे.  या स्पर्धेत देशातले सुमारे १० हजार खेळाडू सहभागी झाले आहेत.

 

स्पर्धेचं औपचारिक उद्घाटन होण्याआधी २६ जानेवारीला उधमसिंगनगरच्या गोलापूर इथं झालेल्या ट्राय-थलॉन स्पर्धेत मणिपूर आणि महाराष्ट्रानं पदकं जिंकली आहेत.