डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मालदीवची राजधानी मालेमध्ये दाखल

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मालदीवची राजधानी माले इथं पोहोचले. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष डॉ. मोहम्मद मुइझ्झू यांनी व्हॅलेना आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रधानमंत्री मोदी यांचं स्वागत केलं. प्रधानमंत्री मोदी दोन दिवसांच्या मालदीव दौऱ्यावर असून हा त्यांचा तिसरा मालदीव दौरा आहे.

 

प्रधानमंत्री मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मुइझ्झू आज विविध मुद्द्यांवर चर्चा करतील. गेल्या वर्षी मालदीवचे अध्यक्ष मुइझ्झू भारत दौऱ्यावर आले असताना झालेल्या भारत-मालदीव संयुक्त व्यापक आर्थिक आणि सागरी सुरक्षा भागीदारीच्या अंमलबजावणीतील प्रगतीचा आढावाही ते घेतील. मुइझ्झू यांच्या दौऱ्यादरम्यान मालदीवमध्ये रूपे कार्डाची सुरुवात झाली होती. तसंच भारत आणि मालदीवला यूपीआयद्वारे जोडायलाही दोन्ही देशांनी संमती दिली होती. यासंदर्भात भारताचे उच्चायुक्त जी. बालसुब्रमण्यम यांनी आकाशवाणीला माहिती दिली.

 

उद्या मालदीवच्या ६०व्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात प्रधानमंत्री मोदी सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. मोदी यांचा हा दौरा भारताच्या ‘नेबरहूड फर्स्ट’ धोरणाचं आणि ‘व्हिजन ओशन’चं महत्त्व अधोरेखित करतो.

 

मूळचे पुण्याचे असलेले डॉ. चंद्रशेखर रावळ सध्या मालदीवमध्ये कार्यरत आहेत. प्रधानमंत्री मोदी यांची भेट घेण्याचा अनुभव अतिशय चांगला होता अशी प्रतिक्रिया त्यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केली. 

 

दरम्यान, उद्या मायदेशी परतल्यानंतर प्रधानमंत्री मोदी दोन दिवसांच्या तामिळनाडू दौऱ्यावर जातील. शनिवारी ते तुतिकोरिन इथं ४ हजार ८०० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण करतील. तसंच तुतीकोरिन विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचं उद्घाटनही करतील.