पश्चिम आशियात सुरु झालेल्या संघर्षाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज इराणचे अध्यक्ष मसऊद पेझेश्कियान यांच्याकडे तीव्र चिंता व्यक्त केली. दोघांमधे यासंदर्भात तपशीलवार चर्चा झाली आणि पेझेश्कियान यांनी आपली भूमिका मांडली असं मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमधे म्हटलं आहे.
या क्षेत्रातला तणाव कमी करणं गरजेचं असून त्याकरता संवादाचा आणि वाटाघाटींचा मार्ग स्वीकारणं या भागातल्या शांतता, स्थैर्य आणि सुरक्षेच्या दृष्टीनं आवश्यक असल्याचं मोदी यांनी सांगितलं. भारत नेहमीच शांतिस्थापनेच्या बाजूने असेल याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
इराणमधून भारतीयांना सुखरुप मायदेशी आणण्यात दिलेल्या पाठिंब्याकरता मोदी यांनी पेझेश्कियान यांचे आभार मानले. दोन्ही नेत्यांनी व्यापार, आर्थिक सहकार्य आणि विज्ञान तंत्रज्ञान अशा विविध मुद्यांवर चर्चा केली.