प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यातल्या सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये एक उद्यान विकसित करण्यात येणार असून या उद्यानांना नमो उद्यान असं नाव देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. प्रत्येक उद्यानासाठी १ कोटी रुपयांचा निधीही देण्यात येणार आहे. नव्याने विकसित झालेल्या या उद्यानांची विभागीय स्तरावर स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. त्या माध्यमातून प्रत्येक विभागातून ३ नगरपरिषद आणि नगरपंचायतींना बक्षिसं दिली जातील.
महसूल आणि वन विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत ‘सेवा पंधरवडा’ हे विशेष अभियान राबवणार आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण विभागामार्फत राज्यातली सर्व विद्यापीठं आणि महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विविध उपक्रमांचे आयोजन होईल. कौशल्य विकास विभाग राज्यातल्या साडे सातशे गावांमध्ये स्वच्छता अभियान राबवणार आहे. राज्यातल्या ४१९ शासकीय औद्योगिक संस्थांमधून हजारो विद्यार्थी एकत्र येऊन हे अभियान राबवतील. भाजपाकडून आयोजित सेवा पंधरवड्यात १ लाख मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, नेत्र तपासणी, रुग्णांना चष्मे वाटप, मोदी विकास मॅरेथॉन, क्रीडा स्पर्धा असे विविध कार्यक्रम होणार आहेत.