प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज केवडिया इथं एकता नगरमध्ये २५ ई-बसना हिरवा झेंडा दाखवला. तसंच एक हजार १४० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. पर्यावरणपूरक पर्यटन, आदिवासी भागांचा विकास, आधुनिक पायाभूत सुविधा हे या प्रकल्पाचं उद्दिष्ट आहे.
प्रधानमंत्री मोदी उद्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित राष्ट्रीय एकता दिवस समारोहात सहभागी होतील तसंच स्टॅच्यू ऑफ युनिटीला पुष्पांजली अर्पण करतील. ते बिरसा मुंडा आदिवासी विद्यापीठाचं आणि गुरुदेश्वर इथं हॉस्पिटॅलिटी डिस्ट्रिक्टच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन करणार आहेत.