October 10, 2025 2:53 PM

printer

पीएम धन-धान्य कृषी योजना आणि दलहन आत्मनिर्भरता मोहिमेचा उद्या प्रारंभ

प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजनेचा प्रारंभ उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत पुसा इथं होणार आहे. या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दलहन आत्मनिर्भरता मोहिमेचं उद्घाटनही करतील. याच कार्यक्रमात शेतकऱ्यांसाठी ४२ हजार कोटी रुपयांहून अधिक मूल्यांच्या विविध योजनांचा ही प्रारंभ ते करणार आहेत. तसंच पशुपालन, मत्स्यपालन आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रांतल्या ११ शे हून अधिक प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी मोदी यांच्या हस्ते केली जाणार आहे. राज्यामध्ये केंद्र आणि राज्य शासनाद्वारे कार्यान्वित असलेल्या ३६हून अधिक योजना राबवून पिकांची उत्पादकता वाढवणं, पीक उत्पादनाची शाश्वतता सुनिश्चित करणं, तसंच काढणी पश्चात तंत्रज्ञान आणि पतपुरवठा प्रणाली मजबूत करण्याच्या उद्देशानं देशातल्या १०० आकांक्षित जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवण्यात येणार आहे. 

 

यामध्ये महाराष्ट्रातल्या छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, पालघर, रायगड, धुळे या नऊ जिल्ह्यांची निवड झाली आहे. महाराष्ट्रात  राज्यस्तरीय कार्यक्रम पुण्यात कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या कार्यक्रमात कृषी क्षेत्रात प्रयोगशील आणि प्रगतिशील कामगिरी करणारे ३०० हून अधिक शेतकरी सहभागी होणार असल्याचं  कृषीमंत्री भरणे यांनी सांगितलं.