जागतिक पातळीवर अनेक आव्हानं आणि अनिश्चित वातावरण असूनही भारताची विकास वाटचाल लक्षणीय असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. उत्तरप्रदेशात ग्रेटर नॉयडा इथं आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याचं उद्घाटन करताना आज ते बोलत होते. आत्मनिर्भरतेचा मंत्रच भारताला तारून नेईल, असं ते म्हणाले.
सरकारच्या जेम पोर्टलवर सुमारे २५ लाख वस्तू आणि सेवा पुरवठादार विक्री करत आहेत तसंच युपीआय, आधार, डिजिलॉकर, अशा अनेक सुविधा उद्योजक आणि व्यावसायिकांना उपलब्ध आहेत.
येत्या सोमवारपर्यंत चालणाऱ्या या मेळ्यात उत्तर प्रदेशातल्या विविध हस्तकला परंपरा, आधुनिक उद्योग, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग तसंच उदयोन्मुख उद्योजक एकाच व्यासपीठावर एकत्र आले आहेत.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज राजस्थानात एक लाख २२ हजार १०० कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन करणार आहेत. १९ हजार २१० कोटी रुपये खर्चाच्या हरित ऊर्जा प्रकल्पांचं उद्घाटन आणि फलोदी, जैसलमेर, जालोर आणि सीकर इथं सौर प्रकल्पांचं उद्घाटन मोदी यांच्या हस्ते होणार आहे.