प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या ११ वर्षात आपल्या कामातून राजनीतीचे नवे परिमाण स्थापित केल्याचे गौरवोद्गार केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दूरदर्शनला दिलेल्या मुलाखतीत काढले. प्रधानमंत्री नेहमीच राष्ट्र प्रथम या दृष्टीनं काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
वैष्णव यांनी आज नवी दिल्ली इथं एका कार्यक्रमात सेवापर्वावर आधारित दूरदर्शनसाठी विशेष कार्यक्रमांची मालिका सुरू केली. यात तीन माहितीपट आणि एका विशेष कार्यक्रमाचा समावेश आहे. संकल्प की शक्ती, सुशासन का सामर्थ्य, विश्वपटल पर नेतृत्व का शंखनाद आणि कर्मयोगी – एक अंतहीन यात्रा अशी या माहितीपटांची नावं आहेत. याव्यतिरिक्त, प्रादेशिक भाषांमधले अनेक माहितीपट देखील तयार केले गेले असून ते दूरदर्शनच्या प्रादेशिक केंद्रांद्वारे प्रसारित केले जातील, अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे आयोजित केलेल्या मोहिमेअंतर्गत देशभरात रक्तदान शिबिरे, स्वच्छता मोहीम, आरोग्य तपासणी शिबिरे, वृक्षारोपण आणि प्रदर्शन आदी अनेक लोकोपयोगी कार्यक्रम होत आहेत. राज्यातही यानिमित्त विविध कार्यक्रम झाले.