प्रधानमंत्र्यांपासून ते मुख्यमंत्र्यांसहित कोणत्याही मंत्र्याला अटक झाल्यास जर ३० दिवसांच्या आत त्याला जामीन मिळाला नाही तर ३१व्या दिवशी त्याला राजीनामा द्यावा लागेल असा कायदा केंद्र सरकार आणू पाहत आहे, परंतु सर्व विरोधी पक्ष याला विरोध करत आहेत, अशी टीका प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केली. बिहारच्या गयाजी इथं आज ते एका जाहीर सभेत बोलत होते.
प्रधानमंत्री आज बिहार आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. बिहारमध्ये गयाजी इथं १३ हजार कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. यामध्ये उर्जा, रस्ते, आरोग्य, गृहनिर्माण, शहरी विकास आणि पाणीपुरवठा अशा विविध विकास योजनांचा समावेश आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गेल्या अकरा वर्षांत ११ कोटी घरे दिली गेली असून बिहारमध्ये फक्त गयाजी मध्येच २ लाख घरे दिली असल्याचं ते म्हणाले. या घरांमध्ये वीज, पाणी, शौचालय आणि गॅस जोडण्या दिल्या गेल्या आहेत. देशातल्या प्रत्येक कुटुंबाला पक्के घर मिळेपर्यंत ही योजना सुरूच राहील असं प्रधानमंत्री मोदी यांनी यावेळी सांगितलं. यावेळी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजनेच्या काही लाभार्थ्यांना प्रातिनिधिक रूपात घरांच्या चाव्या देण्यात आल्या.
राज्यातल्या रोजगारनिर्मितीसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांचं कौतुक केलं. बिहारमध्ये कर्करोगावरच्या उपचारांसाठी सुरू झालेल्या रुग्णालयाविषयी प्रधानमंत्री म्हणाले.
बिहारच्या विकासासाठी केंद्र सरकारनं केलेल्या साहाय्याबद्दल मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी प्रधानमंत्र्यांना धन्यवाद दिले.
बिहार इथला दौरा आटोपल्यानंतर प्रधानमंत्री पश्चिम बंगालमध्ये कोलकाता कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करतील. तसंच नव्याने बांधलेल्या मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवतील आणि कोलकाता इथं ५ हजार २०० कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील.