१०० वर्षांपूर्वी श्री नारायण गुरू आणि महात्मा गांधी यांची झालेली भेट ही आजही सामाजिक समरसतेसाठी, विकसित भारताच्या उद्देशासाठी उर्जेचा एक स्रोत आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. ते आज नवी दिल्ली इथे भारतातले दोन महान आध्यात्मिक नेते श्री नारायण गुरु आणि महात्मा गांधी यांच्यातल्या ऐतिहासिक संवादाच्या शताब्दी समारंभात बोलत होते. या भेटीने भारतीय स्वातंत्र्य लढ्याला दिशा तर दाखवलीच, पण स्वातंत्र्य मिळवण्याच्या उद्देशाला आणि स्वतंत्र भारताच्या स्वप्नाला एक आयामही दिला. सत्य, सेवा आणि सौहार्दावर श्री नारायण गुरू यांचा ठाम विश्वास होता. त्यांचे हेच विचार आपल्याला सब का साथ, सब का विकाससाठी मार्गदर्शन करतात, असं मोदी यावेळी म्हणाले.
महात्मा गांधी यांच्या नारायण गुरूंसोबतच्या भेटीदरम्यान १२ मार्च १९२५ रोजी शिवगिरी मठात हा ऐतिहासिक संवाद झाला आणि तो वैकोम सत्याग्रह, धर्मांतर, अहिंसा, अस्पृश्यता निर्मूलन, मोक्षप्राप्ती, दलितांचे उत्थान इत्यादींवर केंद्रित होता. भारताच्या सामाजिक आणि नैतिक रचनेला आकार देणाऱ्या दूरदर्शी संवादावर चिंतन करण्यासाठी आणि त्यांचं स्मरण करण्यासाठी या विशेष समारंभाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन, खासदार अदूर प्रकाश आणि शिवगिरी मठाचे साधू उपस्थित आहेत.