देशातील पहिल्या वंदे भारत शयनयान रेल्वेला प्रधानमंत्र्यांकडून हिरवा झेंडा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारतात विकासकामांना वेग देणाऱ्या ३ हजार २५० कोटी रुपये खर्चाच्या विविध रस्ते आणि रेल्वे पायाभूत प्रकल्पांचं आज उदघाटन केलं. 

 

मालदा रेल्वे स्थानकातून हावडा, गुवाहाटी आणि कामाख्या दरम्यान धावणाऱ्या देशातील पहिल्या वंदे भारत शयनयान रेल्वेलाही आज दुरदृश्य प्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखवला. त्याबरोबरच चार आधुनिक अमृत भारत एक्सप्रेस रेल्वेगाड्यांनाही प्रधानमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवला. शयनयान वंदे भारत रेल्वे पूर्णपणे वातानुकूलित असून प्रवाशांना परवडणाऱ्या दरात सेवा देणार आहे. यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास जलद, सुरक्षित आणि अधिक सोयीस्कर होणार आहे. एकूण ८२३ प्रवाशांची क्षमता असलेल्या या रेल्वेत १६ आधुनिक कोच आहेत.

 

राष्ट्रीय महामार्गाच्या धुपगुरी-फलकाता दरम्यान चौपदरीकरणाचं भूमिपूजनही मोदी यांनी यावेळी केलं. यामुळे, उत्तर बंगालमधील प्रादेशिक दळण वळणाला चालना मिळणार आहे.

 

प्रधानमंत्री आज संध्याकाळी आसामला भेट देणार असून आपल्या दोन दिवसांच्या दौऱ्यात ते विकास प्रकल्पाचं भूमिपूजन करणार असून दोन नवीन अमृत भारत एक्सप्रेस रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत. गुवाहाटी इथं बोडो जमातीतल्या १० हजार नर्तकांसह सादर होणार असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाला मोदी आज संध्याकाळी उपस्थित राहणार आहेत. नागाव जिल्ह्यात कालियाबोर इथं काझीरंगा एलिव्हेटेड अर्थात जमिनीपासून उंचावरून जाणाऱ्या वन्यजीव कॉरिडॉरचं प्रधानमंत्री उद्या सकाळी भूमिपूजन करणार आहेत. यामुळे वन्यजीवांच्या हालचालींमध्ये  येणारा अडथळा टाळून मानव-वन्यजीव संघर्ष आटोक्यात आणणं शक्य होणार आहे. त्यानंतर, प्रधानमंत्री  कामाख्या-रोहतक अमृत भारत एक्सप्रेस तसंच दिब्रुगड-गोमती नगर अमृत भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील.