डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

प्रधानमंत्री येत्या सोमवारपासून फ्रान्स आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या सोमवारपासून फ्रान्स आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांच्या आमंत्रणावरून प्रधानमंत्री १० ते १२ फेब्रुवारी दरम्यान फ्रान्सला भेट देणार आहेत. पॅरिसमध्ये आयोजित एआय कृती शिखर परिषदेचं सह-अध्यक्ष पद ते भूषवतील. या शिखर परिषदेत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या व्यवस्थापनाचं भविष्य या विषयावर विविध राष्ट्रांचे नेते चर्चा करणार आहेत. एआयचा मूल्याधिष्ठित विकास, उपलब्धता, आणि नवोन्मेष अशा अन्य पैलूंवरही या परिषदेत चर्चा होणार आहे. मोदींच्या या दौऱ्यात ते फ्रान्सच्या नेतृत्वाशी संरक्षण, व्यापार, ऊर्जा सहकार्य इत्यादी मुद्द्यांवर तसंच द्विपक्षीय संबंध आणखी दृढ करण्यासंदर्भात चर्चा करतील. तसंच मार्सेली इथं सुरू होत असलेल्या भारताच्या नव्या वाणिज्य दूतावासाच्या उद्घाटन समारंभालाही ते हजेरी लावणार आहेत.

 

फ्रान्सची भेट आटोपून १२ फेब्रुवारीला प्रधानमंत्री अमेरिकेला रवाना होतील. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर काही आठवड्यातच प्रधानमंत्री या देशाला भेट देत असल्यानं, त्यांचा अमेरिका दौराही फ्रान्सइतकाच महत्त्वाचा मानला जात आहे.