डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

प्रधानमंत्री १२ हजार कोटींहून अधिक खर्चाच्या आरोग्यविषयक योजनांचा प्रारंभ करणार

प्रधानमंत्री नेरंद्र मोदी आज धन्वंतरी दिन आणि नवव्या आयुर्वेद दिनानिमित्त नवी दिल्ली इथं आरोग्याशी संबंधित जवळपास १२ हजार ८५० कोटी रुपयांच्या योजनांचा प्रारंभ करणार आहेत. ७० वर्षं आणि त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना आयुष्मान प्रधानमंत्री भारत जन आरोग्य योजनेत सामावून घेण्याच्या योजनेचीही ते आज सुरुवात करणार आहेत. यामुळे समाजाच्या सर्व वर्गातील ज्येष्ठ नागरिकांना आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध होतील.

 

याशिवाय पंतप्रधानांच्या हस्ते आरोग्य सेवा आणखी सुधारण्यासाठी विविध आरोग्य संस्थांचं उद्घाटन आणि पायाभरणीही करण्यात येणार आहे. देशातल्या पहिल्या अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या दुसऱ्या टप्प्याचंही ते उद्घाटन करणार आहेत. या टप्प्यात एक पंचकर्म रुग्णालय, एक क्रीडा वैद्यक संस्था, एक केंद्रीय वाचनालय, एक आयटी आणि स्टार्टअप इन्क्यूबेशन सेंटर आणि ५०० खाटांच्या रुग्णालयाचा समावेश आहे. याव्यतिरिक्त विविध राज्यांमधल्या आरोग्याशी संबंधित इतर अनेक संस्था आणि उपक्रमांचाही ते दूरस्थ पद्धतीनं प्रारंभ करतील.

 

तसंच आजच्या ९ व्या आयुर्वेद दिनानिमित्त नवी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था म्हणजेच एम्समध्ये आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमातही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अनेक अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांचा दूरस्थ पद्धतीनं प्रारंभ करतील. यामध्ये दंतवैद्यक विज्ञान संशोधन आणि रेफरल संस्था, जनौषधी केंद्राचा समावेश आहे.