प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज क्रोएशियामधल्या झग्रेब शहरात पोहोचले. क्रोएशियाचे प्रधानमंत्री आंद्रेज प्लेनकोविच यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. यावेळी प्रधानमंत्री मोदी यांच्या स्वागतासाठी स्थानिक कलाकारांनी पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी क्रोएशियाचे प्रधानमंत्री आंद्रेज प्लेनकोविच यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा करणार आहेत. तसंच दोन्ही नेते मार्क्स स्क्वेअर इथल्या स्वागत समारंभात सहभागी होतील. या भेटीत दोन्ही देशात महत्त्वाच्या क्षेत्रात करार होतील आणि धोरणात्मक सहकार्य वाढवण्यावर भर दिला जाईल. विज्ञान, तंत्रज्ञान, शेती, शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रातले अनेक महत्त्वाचे करार भारत आणि क्रोएशिया यांच्यात होणार आहेत. तसंच झग्रेब मधल्या विद्यापीठातल्या हिंदी अध्यासन केंद्राचा विस्तार केला जाईल, त्यामुळे भारताच्या भाषिक आणि शैक्षणिक प्रसाराला चालना मिळेल.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी क्रोएशियाचे राष्ट्राध्यक्ष झोरन मिलानोविच यांचीही भेट घेतील. भारताच्या दहशतवादाविरोधातल्या लढ्याला आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला कायमस्वरुपी सदस्यत्व मिळण्यासाठी क्रोएशियानं पाठिंबा दिला आहे, त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.