प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज तीन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात जॉर्डनची राजधानी अम्मान इथं पोहोचले. जॉर्डनचे प्रधानमंत्री जाफर हसन यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. अम्मान इथल्या भारतीय समुदायानं केलेल्या स्वागताबद्दल प्रधानमंत्री मोदी यांनी समाजमाध्यमाद्वारे त्यांचे आभार मानले. जॉर्डनचे राजे अब्दुल्ला दुसरे इब्न अल हुसैन यांच्या निमंत्रणावरून ते जॉर्डनला भेट देत आहेत. यादरम्यान राजे अब्दुल्ला आणि प्रधानमंत्री जाफर हसन यांच्याशी प्रधानमंत्री मोदी सखोल द्विपक्षीय चर्चा करतील, तसंच जॉर्डनमधल्या भारतीय समुदायाशीही संवाद साधतील.
यंदा भारत आणि जॉर्डन यांच्यातल्या राजनैतिक संबंधांना ७५ वर्षं पूर्ण होत असल्यानं प्रधानमंत्र्यांचा हा दौरा आणखी महत्त्वाचा मानला जात आहे. इम्मान इथून प्रधानमंत्री मोदी उद्या इथियोपियाची राजधानी अद्दिस अबाबा इथं पोहोचतील आणि इथियोपियाचे प्रधानमंत्री डॉ. अबी अहमद अली यांच्याशी चर्चा करतील. इथल्या भारतीय समुदायाशीही ते संवाद साधणार आहेत आणि इथियोपियाच्या संसदेच्या संयुक्त सत्राला संबोधित करणार आहेत.
या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात, बुधवारी प्रधानमंत्री ओमानची राजधानी मस्कत इथं जातील. भारत आणि ओमान यांच्यातल्या राजनैतिक संबंधांना यंदा ७० वर्षं पूर्ण होत आहेत. मस्कतमध्ये ते ओमानच्या सुलतानांशी चर्चा करतील आणि इथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधतील.