प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेचा दौरा यशस्वीपणे आटोपून आज मायदेशी परतले. जोहान्सबर्ग जी-20 शिखर परिषदेच्या यशस्वी आयोजनाचं मोदी यांनी कौतुक केलं असून, राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांचे आणि दक्षिण आफ्रिकेच्या सरकारचे आभार मानले आहेत. इथं विविध जागतिक नेत्यांशी झालेल्या बैठका आणि संवाद यशस्वी ठरले असून, त्यामुळं विविध देशांशी भारताचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होतील, असं त्यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. या शिखर परिषदेचा काल समारोप झाला.
या परिषदेच्या तिसऱ्या सत्रात त्यांनी सांगितलं की, तंत्रज्ञान हे मानवकेंद्रित, जागतिक आणि मुक्त स्रोतावर आधारित असायला हवं, ‘सर्वांसाठी समन्यायी भविष्य – अत्यावश्यक खनिजं, योग्य काम आणि कृत्रिम बुद्धिमत्ता’ या संकल्पनेवर हे सत्रआधारित होतं. शाश्वत विकास, विश्वासार्ह व्यापार, निष्पक्ष वित्तपुरवठा आणि सर्वांना समृद्ध करणारी प्रगती आवश्यक आहे, असं मोदी यावेळी म्हणाले. शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर, प्रधानमंत्री मोदी यांनी जपानच्या प्रधानमंत्री सानी ताकाइची, कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी आणि इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याबरोबर द्विपक्षीय बैठका घेतल्या.