ब्रुनेई आणि सिंगापूर दौरा आसियान क्षेत्रातल्या भारताच्या भागीदारीला आणखी बळ देईल – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी ब्रुनेई आणि सिंगापूर या  देशांच्या तीन दिवसीय  दौऱ्यावर रवाना झाले. हे दोन्ही देश भारताच्या ऍक्ट ईस्ट आणि हिंद-प्रशांत महासागर दुष्टीकोनामधले महत्त्वाचे भागीदार असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. आपला हा दौरा या दोन्ही देशांसह, आसियान क्षेत्रातल्या देशांबरोबरची भारताची भागीदारी आणखी मजबूत करेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. भारत आणि ब्रुनेई यांच्यातल्या राजनैतिक संबंधांना ४० वर्ष पूर्ण होत असून, सुलतान हाजी हसनल बोलकिया आणि राजघराण्यातल्या इतर सदस्यांची आपण भेट घेणार असल्याचं ते म्हणाले. 

 

प्रधानमंत्री उद्या ब्रुनेई इथून सिंगापूरच्या भेटीसाठी रवाना होतील. सिंगापूरचे राष्ट्राध्यक्ष थर्मन षण्मुगरत्नम, प्रधानमंत्री  लॉरेन्स वोंग, आणि मंत्रिमंडळाच्या इतर सदस्यांची ते यावेळी भेट घेतील. सिंगापूरमधल्या व्यापारी समुदायाशी देखील ते संवाद साधतील. सिंगापूरबरोबरच्या विशेषतः  प्रगत उत्पादन, डिजिटलायझेशन आणि शाश्वत विकासाच्या नवीन आणि उदयोन्मुख क्षेत्रांमधल्या धोरणात्मक भागीदारीवर  चर्चा करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी म्हटलं आहे.