डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

भारताच्या ऍक्ट ईस्ट धोरणामुळे आसियान देशांमधल्या परस्पर संबंधांना नवी ऊर्जा, गती आणि दिशा मिळाली – प्रधानमंत्री

भारताच्या ऍक्ट ईस्ट धोरणामुळे आसियान देशांमधल्या परस्पर संबंधांना नवी ऊर्जा, गती आणि दिशा दिली आहे, २१ वं शतक हे भारत आणि आसियान देशांचं शतक असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. लाओस मधल्या व्हिएंतियान इथं भारत-आसियान शिखर परिषदेला ते संबोधित करत होते. भारत आणि आसियान देश हे शांतताप्रिय देश असून एकमेकांच्या सर्वभौमत्व आणि राष्ट्रीय एकात्मतेचा आदर करतात, जगाच्या इतर भागातले देश संघर्ष आणि तणावात असताना भारत आणि आसियान देशांमधली मैत्री, सहकार्य, संवाद आणि भागीदारी अत्यंत महत्वाची आहे, असं प्रधानमंत्री म्हणाले. आसियान प्रदेशातला व्यापार मागच्या दहा वर्षांत दुप्पट झाला असून १३० अब्ज डॉलरवर पोहोचल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. भारतातून सातही आसियान देशांमध्ये जायला थेट विमानसेवा असून लवकरच भारत ते ब्रुनेई विमानसेवा सुरू होईल, असंही प्रधानमंत्री म्हणाले. 

 

दरम्यान, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दुपारी व्हिएंतियान इथं पोहोचल्यानंतर लाओसचे गृहमंत्री विलाव्योंग बौद्दखम यांनी स्वागत केलं. तसंच भारतीय वंशाच्या नागरिकांनीही प्रधानमंत्र्यांचं स्वागत केलं. त्यानंतर स्थानिक कलाकारांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासमोर लाओ रामायण म्हणजे फलक फलम सादर केलं. हे रामायण या महाकाव्याचं लाओ रुपांतर आहे. त्यानंतर सेंट्रल बुद्धिस्ट फेलोशिप ऑर्गनायजेशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रधानमंत्री सहभागी झाले होते.