जर्मनीशी मैत्री आणि भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी वचनबद्ध – प्रधानमंत्री

भारत जर्मनीशी मैत्री आणि भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी वचनबद्ध आहे, असं प्रतिपादन आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. ते आज अहमदाबाद इथे जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्झ यांच्यासह संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते. भारत आणि जर्मनीने आपल्या धोरणात्मक भागीदारीची २५ वर्षं पूर्ण केली असून यंदा दोन्ही देशांच्या राजनैतिक संबंधांना ७५ वर्षं पूर्ण होत आहेत. हे टप्पे सामायिक महत्त्वाकांक्षा, परस्पर विश्वास आणि सहकार्याला सातत्याने बळकटी देणारे आहेत, असंही मोदी म्हणाले. 

 

तत्पूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्झ यांच्यात आज गुजरातमध्ये गांधीनगर इथल्या महात्मा मंदिरात बैठक झाली. मर्झ यांचा हा पहिलाच दौरा असून विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. यावेळी गेल्या २५ वर्षांत भारत-जर्मनीदरम्यानच्या धोरणात्मक भागीदारीमध्ये झालेल्या प्रगतीचा आढावाही घेण्यात आला. तत्पूर्वी प्रधानमंत्री मोदी आणि चान्सलर मर्झ यांनी साबरमती आश्रमात महात्मा गांधींना अभिवादन केलं तसंच महात्मा गांधीचं निवासस्थान असलेल्या हृदयकुंज इथं भेट देऊन चरख्यातून सूत कातण्याची प्रक्रियाही पाहिली. तसंच, अहमदाबादमध्ये साबरमती रिव्हरफ्रंट येथे आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवातही भाग घेतला.