प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीतील राय पिथोरा सांस्कृतिक संकुलात, भगवान बुद्धांशी संबंधित, पवित्र पिपरहवा अवशेषांच्या, भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचं उद्घाटन करतील. इतिहास, संस्कृती आणि भगवान बुद्धांच्या आदर्शांबद्दल प्रेम असलेल्यांसाठी आजचा दिवस खूप खास असल्याचा उल्लेख समाज माध्यमावरील पोस्ट मध्ये प्रधानमंत्र्यांनी केला आहे.
शतकाहून अधिक काळानंतर परत आणलेले पिपरहवा अवशेष आणि राष्ट्रीय संग्रहालय नवी दिल्ली तसंच भारतीय संग्रहालय कोलकाता, यांच्या संग्रहात जतन केलेले, पिपरहवा इथले, अस्सल अवशेष आणि पुरातत्वीय साहित्य, या प्रदर्शनात एकत्र आणले असल्याचं, मोदींनी म्हंटलं आहे. हे प्रदर्शन भगवान बुद्धांच्या उदात्त विचारांना अधिक लोकांपर्यंत पोचवण्याच्या, सरकारच्या वचनबद्धतेशी सुसंगत असल्याचं सांगून, ते म्हणाले की, देशातील तरुणाई आणि त्याच्या समृद्ध संस्कृतीमधील बंध, आणखी दृढ करण्याचा हा एक प्रयत्न आहे. हे अवशेष परत आणण्यात योगदान देणाऱ्या प्रत्येकाचं त्यांनी कौतुक केलं.