माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या मायक्रोसॉफ्ट कंपनीनं भारतात साडेसतरा अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करण्याचा विचार जाहीर केला आहे. मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांनी, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर आपल्या समाज माध्यमावरील संदेशात ही माहिती दिली.
याआधीही जानेवारीत, मायक्रोसॉफ्टनं भारतात 3 अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या गुंतवणुकीची घोषणा केली होती. आशिया खंडातील ही सर्वात मोठी गुंतवणूक असून, या गुंतवणुकीमुळे, भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी पायाभूत सुविधा, कौशल्ये आणि सार्वभौम क्षमता निर्माण करता येतील आणि भारताच्या महत्वाकांक्षी योजनांना सहाय्य मिळेल.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मायक्रोसॉफ्टच्या आशियातील या सर्वात मोठ्या गुंतवणुकीचे स्वागत केलं आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल संपूर्ण जगाच्या भारताकडून अपेक्षा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.