जपानी तंत्रज्ञान आणि भारताच्या प्रतिभेचं एकात्मिकीकरण या शतकातल्या तंत्रज्ञान क्रांतीचं नेतृत्व करू शकतं असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. प्रधानमंत्र्यांनी आज जपानची राजधानी टोकियो इथं भारत जपान आर्थिक मंचाला संबोधित केलं. भारत कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर, क्वांटम कॉम्प्युटिंग, जैवतंत्रज्ञान आणि अंतराळ क्षेत्रात महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवत आहे, तसंच आता भारत आपल्या संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रांनंतर, अणुऊर्जा क्षेत्रही खासगी क्षेत्रासाठी खुलं करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
जपानचे प्रधानमंत्री शिगेरू इशिबा यांनीही या मंचाला संबोधित केलं. जपानचं प्रगत तंत्रज्ञान आणि भारताची प्रतिभा एकमेकांना पूरक असल्याचं ते म्हणाले. भारताच्या मेक इन इंडिया उपक्रमात अनेक जपानी कंपन्या महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. दोन्ही देशांमध्ये झालेले नवे सहकार्य करार हे भारतात गुंतवणूक वाढवण्याच्या जपानच्या वचनबद्धतेचं प्रतिक असल्याचंही ते म्हणाले.
या शिखर परिषदेदरम्यान, दोन्ही नेते परस्परांतल्या द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेणार आहेत. तसंच गेल्या ११ वर्षांत वृद्धिंगत होत असलेली धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी पुढे नेण्याच्या दृष्टीनंही चर्चा होण्याची अपेक्षा आहे. जपानच्या दौरा आटोपून प्रधानमंत्री चीन दौऱ्यावर जाणार आहेत. तिथं ते तियानजिन इथं होणार असलेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत ते सहभागी होतील.