नौवहन क्षेत्रामुळे देशाच्या विकासाला चालना मिळत असून भारताच्या नौवहन सामर्थ्यावर जगाचा विश्वास आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. मुंबईत सागरी क्षेत्रात काम करणाऱ्या जगभरातल्या प्रतिनिधींच्या परिषदेला ते आज संबोधित करत होते. मागच्या दशकभरात नौवहन क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन झालं असून व्यापार आणि बंदरे पायाभूत सुविधांना चालना मिळाली असं प्रधानमंत्री म्हणाले. सरकारनं नौवहन क्षेत्रात सुधारणांसाठी महत्त्वाची पावलं उचलली आहेत, शतकभर जुने कायदे बदलून २१ व्या शतकातले आधुनिक कायदे लागू केले आहेत. यामुळे स्टेट मेरिटाईम बोर्डाची क्षमता वृद्धिंगत झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं.
डिजीटायजेशनचा विस्तार करण्यात आला आहे, मर्चंट शिपींग ऍक्टमधे बदल करण्यात आला आहे, सरकारचा हस्तक्षेप कमी झाला आहे, असंही त्यांनी सांगितलं. सरकार नौवहन क्षेत्राला प्राधान्य देत असून या क्षेत्रात गुंतवणूक करण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी यावेळी केलं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस, बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल उपस्थित होते.