प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. यावेळी शहरी विकास, उर्जा, रस्ते आणि रेल्वे या क्षेत्रातील विविध पाच हजार चारशे कोटी रुपयांच्या विकासप्रकल्पांची पायाभरणी अहमदाबादमधील खोडलधाम मैदानावर त्यांच्या हस्ते आज होणार आहे. यामध्ये 65 किमी लांबीच्या महेसाणा-पालनपूर रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण, कलोल-काडी-काटोसन रोड आणि बेचराजी-रानुज रेल्वे मार्गांचे गेज रूपांतरणआदी प्रकल्पांचा समावेश आहे.
तसंच काटोसन रोड आणि साबरमती दरम्यान एका प्रवासी रेल्वेलाही हिरवा झेंडा दाखवतील आणि बेचराजी इथून मालवाहू रेल्वेसेवेचा शुभारंभ करतील. याव्यतिरिक्त, पंतप्रधान विरमगाम-खुदाद-रामपुरा रस्त्याच्या रुंदीकरणाचे उद्घाटन करतील आणि अहमदाबाद-मेहसाणा-पालनपूर मार्गावर सहा पदरी भुमीगत मार्गाची पायाभरणी करतील. हंसलपूर इथं हायब्रिड बॅटरी इलेक्ट्रोड्सच्या स्थानिक उत्पादनाचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. या बॅटरीज 100 देशांमध्ये निर्यात होणार आहेत.