देशभरात सध्या जीएसटी बचत महोत्सव सुरू असून यामुळे नागरिकांमध्ये खूप उत्साह आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून त्यांनी आज देशवासीयांशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा १२७वा भाग होता. यंदाच्या सणासुदीच्या काळात स्वदेशी वस्तूंची खरेदी प्रचंड वाढली असल्याचं त्यांनी सांगितलं. कोणकोणती स्वदेशी उत्पादनं आपण खरेदी केली, याबद्दल नागरिकांनी संदेश पाठवून कळवल्याचंही प्रधानमंत्र्यांनी सांगितलं.
ऑपरेशन सिंदूरनं प्रत्येक भारतीयाला अभिमानानं भारून टाकलं आहे. कधीकाळी नक्षलवाद्यांच्या दहशतीखाली असलेल्या प्रदेशांमध्येही नक्षलवादाविरोधातल्या कारवाईमुळं यंदाच्या सणात आनंदाचे दीप प्रज्वलित झाले, असं सांगून, नक्षलवादाचं समूळ उच्चाटन करायच्या ध्येयाचा पुनरुच्चार त्यांनी केला.
प्रधानमंत्र्यांनी देशवासीयांनी छठच्या शुभेच्छा दिल्या. संस्कृती, निसर्ग आणि समाजातल्या एकतेचं प्रतीक असलेल्या या सणाच्या निमित्ताने समाजातला प्रत्येक घटक एकत्र येतो, हे भारताच्या सामाजिक एकतेचं सर्वात सुंदर उदाहरण असल्याचं ते म्हणाले.
संस्कृत भाषेचं महत्व आणि तिच्या संवर्धनासाठी होत असलेल्या प्रयत्नांची माहितीही त्यांनी दिली. या निमित्तानं त्यांनी यश साळंखे या महाराष्ट्रातील क्रिकेटटू आणि कंटेट क्रिएटर करत असलेल्या प्रयत्नाचाही दाखला दिला. युवा वर्ग करत असलेल्या अशा प्रयत्नांमुळे आनंद वाटत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
येत्या ३१ ऑक्टोबरला लोहपुरुष सरदार पटेल यांच्या जयंतीदिनाचं स्मरण करून, प्रधानमंत्र्यांनी पटेल यांच्या योगदानाला उजाळा दिला. यानिमित्त देशभरात आयोजित होणार असलेल्या ‘रन फॉर युनिटी’ मध्ये सहभागी व्हावं, असं आवाहन त्यांनी केलं.
येत्या ७ नोव्हेंबर रोजी, वंदे मातरम्, या राष्ट्रीय गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाला प्रारंभ होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आणि या गीताचं महत्त्व विषद केलं.
यानिमित्त देशभरात अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आणि यासाठी नागरिकांनी आपल्याला सूचना पाठवाव्यात असं आवाहनही केलं.
निजामाच्या अन्यायाविरोधात लढा देणाऱ्या कोमरम भीम यांची २२ ऑक्टोबरला जयंती झाल्याच्या निमित्तानं प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या योगदानाला उजाळा दिला. तसंच १५ नोव्हेंबरच्या आदिवासी गौरव दिनानिमित्त भगवान बिरसा मुंडा यांनाही त्यांनी आदरांजली वाहिली.
स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाविषीच्या अभिनव उपक्रमांबद्दल प्रधानमंत्र्यांनी माहिती दिली. सागरी परिसंस्थेच्या जतन संवर्धनासाठी खारफुटीचं महत्व त्यांनी अधोरेखित केलं. आपणही जिथं राहतो तिथं झाडं लावावीत, एक पेड़ माँ के नाम ही मोहीम आणखी पुढे न्यावी असं आवाहनही त्यांनी केलं.
भारतीय वंशाचे श्वान आजूबाजूच्या परिस्थितीशी सहजपणे जुळवून घेणारे असतात, त्यामुळे, यापूर्वी देशवासीयांना आणि सशस्त्र दलांना भारतीय जातीचे श्वान पाळायचं आवाहन केल्याचं स्मरण प्रधानमंत्र्यांनी करून दिलं. त्याला प्रतिसाद देत सीमा सुरक्षा दल आणि केंद्रीय राखीव पोलीस दलानं पथकांमध्ये भारतीय वंशाच्या श्वानांची संख्या वाढवल्याची माहिती त्यांनी दिली, तसंच सीमा सुरक्षा दलानं श्वानांना भारतीय नावं द्यायची परंपरा सुरू केल्याचंही त्यांनी सांगितलं. यादृष्टीनंच महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या मुधोळ हाउंड, आणि उत्तर प्रदेशातल्या रामपूर हाउंड या जातीच्या श्वानांना प्रशिक्षण देत असल्याची माहिती त्यांनी ‘मन की बात’मधून दिली.